top of page

रथसप्तमी

आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशून् वसूनि च । ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ।।

आयुष्य, आरोग्य, यश, संतति, संपत्ति, ज्ञान, प्रज्ञा, मेधा याची प्राप्ती सूर्य देवते पासूनच होते त्यामुळे हे वनस्पते (सूर्य देवा) आम्हाला तुझ्या कृपेने हे सर्व प्राप्त होवो.


सर्वच प्राणिमात्रांना सूर्यापासूनच चैतन्य मिळते. त्याच्या प्रकाशाने आरोग्य आणि धान्यादी वस्तू मिळतात. पर्जन्यवृष्टीही त्याच्यावरच अवलंबून असते. पर्जन्यापासून अन्न निर्माण होते आणि अन्नामुळे प्रजा निर्माण होतात. अशा या देवतेची उपासना मानव प्राचीन काळापासून करीत आला आहे. ऋग्वेदात सूर्याची बरीच सूक्ते आहेत. सूर्योपासना हे पूर्वी नित्य कर्मच होते. पुराणातली सप्तमी व्रते ही सगळी सूर्याचीच आहेत. त्यात माघ शु. सप्तमी ही सर्वांत महत्त्वाची होय. माघ शुक्ल सप्तमीस रथसप्तमी म्हणतात.


सात घोड्यांचा रथ व त्यावर अरुणासह सूर्याचे चित्र काढून ‘ध्येयः सदा सवितृमंडल मध्यवर्ती’ या मंत्राने ध्यान करून सूर्य नारायणाची पूजा केली जाते. गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखविला जातो. सप्त धान्ये, सात रुईची पाने, सात बोरे सूर्याला वाहिली जातात. आरोग्यप्राप्ती हे या व्रताचे फल सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आरोग्याची देवता असलेला सूर्य हृदयाशी संबंधित आजार आणि श्वेत कुष्ठ दूर करतो असे मानले जाते. म्हणूनच रथसप्तमीस आरोग्य सप्तमी असे देखील म्हणले जाते.


जागतिक सूर्य नमस्कार दिन


रथसप्तमीचा दिवस हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. खाली दिलेली सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार घालावेत. सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून नियमित सूर्यनमस्कार घातल्याने आरोग्य प्राप्ती होते.

ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसन्निविष्टः ।

केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपर्धृतशंखचक्रः ।।

हा श्लोक म्हणून सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात करावी.


सूर्याची १२ नावे – ॐ मित्राय नमः ।, ॐ रवये नमः ।, ॐ सूर्याय नमः ।, ॐ भानवे नमः ।, ॐ खगाय नमः ।, ॐ पूष्णे नमः ।, ॐ हिरण्यगर्भाय नमः ।, ॐ मरीचये नमः ।, ॐ आदित्याय नमः ।, ॐ सवित्रे नमः ।, ॐ अर्काय नमः ।, ॐ भास्कराय नमः ।, ॐ श्रीसवितृ-सूर्यनारायणाय नमः ।

Comments


Vist our 
Website

bottom of page