लेखिका - दीपाली पाटवदकर, deepali.patwadkar@gmail.com
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_1857d82fd5cd4e3d8123d1fa28a5e7bd~mv2.jpg/v1/fill/w_980,h_551,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_1857d82fd5cd4e3d8123d1fa28a5e7bd~mv2.jpg)
आपण अनेकदा बोलताना रामराज्याचा उल्लेख करतो, रामराज्य म्हणजे आदर्श राज्य! आज श्रीराम नवमी च्या निमित्ताने हे रामराज्य नक्की होतं तरी कसं? श्रीवाल्मिकी रामायणातील अयोध्या कांडात आलेलं त्याचं वर्णन पाहूया.
अयोध्येत एक वेगळेच नाटक घडले होते. आजोळहून आलेल्या भरताला दशरथाच्या मृत्यूची व रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवल्याची वार्ता एका पाठोपाठ एक कळली. दु:ख सागरात बुडालेल्या भरताला या दोन्ही गोष्टींना आपलीच आई कैकेयी कारणीभूत असल्याचेही कळले. कैकेयीची निर्भत्सना करत भरताने रामाला अयोध्येत परत घेऊन यायचा निश्चय केला. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, मुख्य मंत्री, पुरोहित, सैन्य आदि बरोबर घेऊन भरत व शत्रुघ्न रामाला शोधत चित्रकूटला पोचले.
दरम्यान चित्रकुटच्या रम्य परिसरात, मंदाकिनी नदीच्या काठावर राम, लक्ष्मण व सीता पर्णकुटी बांधून राहत होते. आपल्यासाठी सीता अरण्यात आली, याबद्दल रामाला तिचे कौतुक तर होतेच पण तिला सुरक्षित व आनंदात ठेवणे ही मोठी जबाबदारी वाटत होती. सीतेला चित्रकुटच्या परिसराचे, तेथील प्राण्यांचे, वनसंपदेचे वर्णन करून सांगतांना राम सीतेला म्हणाला -
वैदेहि रमसे कच्चित् चित्रकूटे मया सह | पश्यन्ती विविधान् भावान् मनोवाक्कायसंमतान् || २-९४-१८
वैदेही! या चित्रकूट पर्वताच्या सुंदर परिसरात माझ्या बरोबर तू सुखात आहेस ना? पहा, इथल्या सगळ्या सुंदर गोष्टी तुला आवडतील अशा आहेत ना?
अशाप्रकारे सुखसंवाद करत बसलेल्या राम आणि सीतेला, भरत सैन्य घेऊन येत असल्याची वार्ता लक्ष्मणाने दिली. लक्ष्मण युद्ध करण्यासाठी सज्ज झाला, पण रामाला मनोमन खात्री होती की भरत हल्ला करण्यासाठी नाही, पण त्यांना भेटण्यासाठी येत आहे. इतक्यात भरत व शत्रुघ्न रामाचा शोध घेत त्यांच्या पर्णकुटीपाशी पोचले.
भरताचे केस वाढले होते. त्याने अंगावर मृगाजीन धारण केले होते. कृश आणि म्लान झालेल्या भरताला क्षणभर रामाने ओळखलेच नाही! जटा वाढवलेल्या, वल्कले नेसलेल्या, राजसुखांपासून वंचित वनात राहणाऱ्या रामाला पाहून भरताला भडभडून आले. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागलेल्या भरताने श्रीरामाचे पाय धरले. रामाने भरताला अत्यानंदाने जवळ घेतले. त्याच्या मस्तकाचे अवघ्राण घेतले आणि त्याला मांडीवर बसवून रामाने त्याची आपुलकीने चौकशी केली.
भरताला अचानक अरण्यात आलेले पाहून रामाच्या मनात शंका आली, “कदाचित राज्य करायचा अनुभव कमी असल्यामुळे भरताला राज्यकारभार नीट सांभाळता येत नाहीये. म्हणून भरत वनात रामाला शोधत आला असावा?” भरताकडे केलेल्या चौकशीतून रामाचा अयोध्या व प्रजेविषयी असलेला जिव्हाळा ओसंडून वाहतो. त्याच्या भाषणातून राजाने कसे वागावे, राज्य कसे करावे, राजाची कर्तव्य काय आहेत हे रामाने सविस्तरपणे सांगितले -
“बंधो! तू असा अचानक वनात का आलास? आपले पिता व माता सुखरूप आहेत ना? तू आपल्या पित्याची सेवा म्हणून राज्य व्यवस्थित चालवत आहेस ना? आपल्या विद्वान पुरोहितांशी तू आदरपूर्वक वागतोस ना? मला खात्री आहे की तू त्या विनयशील व असूया नसलेल्या दृष्ट्या ऋषींचा सत्कार करत असशील. आपल्या वडिलांच्या वयाच्या निष्णात वैद्यांचा व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांचा तू योग्य मान राखत आहेस ना? ज्यांनी तुला धनुर्विद्या व अर्थशास्त्र शिकवले त्या तुझ्या गुरुजनांशी तू आदराने वागतोस ना? वैद्य, वृद्ध व बालकांना दानाने व मृदू शब्दाने भूषित करीत जा! सर्व शिक्षकांचा, वृद्धजनांचा, ऋषिमुनींचा, अतिथींचा, ब्राह्मणांचा सत्कार करीत जा! आणि रोज न चुकता वेदांचा अभ्यास करत रहा!
“भरता, तुझे मंत्री तुझ्या सारखे शूर आहेत ना? तसेच ते जितेंद्रिय व कुलीन आहेत ना? राजाला सल्ला देणारे मंत्री शास्त्रांमध्ये निपुण असतील, तरच राजाला विजय प्राप्त होतो. या करिता मंत्री निवडतांना तू विशेष काळजी घे. राजाने नेहमी उत्तम लोक हेरून त्यांना योग्य ठिकाणी नेमावे. केवळ एक विद्वान व शहाणा मंत्री असेल, तरीही तो राज्याची भरभराट घडवून आणू शकतो. म्हणून, हे भरता! लोभ असणारे, लाच घेणारे मंत्री चुकूनही नेमू नकोस. तुझ्याकडून काही चूक घडत असल्यास तुला ती दाखवून देणारे मंत्री असावेत. कोणताही निर्णय घेताना तीन किंवा चार मंत्र्यांशी बोलून निर्णय घेत जा. कधी सगळ्यांशी एकत्र चर्चा करून तर कधी एकांतात प्रत्येकाशी बोलून त्यांचे मत जाणून घेत जा. भरता! राज्यातील माहितगार, विद्वान, कौशल्यपूर्ण व मृदुभाषी माणसाला तू राजदूत म्हणून नेमत जा!
“राजपुत्रा! तू योग्य प्रमाणात झोप घेत जा! राजाने वेळेवर झोपून ठरलेल्या वेळी उठावे. झोपायच्या आधी दिवसभरातील घटनांचे व निर्णयांचे चिंतन करावे. कोणताही निर्णय एकट्याच्या विचाराने घेऊ नकोस. चार लोकांशी चर्चा करून निर्णय घे. पण फार लोकांशी सुद्धा चर्चा करू नकोस.
कच्चिद् अर्थम् विनिश्चित्य लघु मूलम् महा उदयम् | क्षिप्रम् आरभसे कर्तुम् न दीर्घयसि राघव || २-१००-१९
“राघवा! जे प्रकल्प हातात घेशील ती कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे असावेत असे बघ. तसेच एकदा एखादा प्रकल्प करायचा ठरला की तो पूर्ण करण्यात अजिबात वेळ दडवू नकोस. इतर राजांना तुझे यशस्वीरीत्या पूर्ण झालेले व हातात घेतलेले प्रकल्प कळू देत. मात्र तू पुढे कोणती कामे हातात घेणार आहेस, तुझ्या मनात कोणत्या योजना आहेत त्यांचा सुगावा त्यांना लागता कामा नये. तू तुझ्या मंत्र्यांशी काय बोलतोस, त्यांच्याशी तुझी काय चर्चा झाली याची माहिती कुणाला कळणार नाही याची दक्षता घे.
“भरता! जी लोक आपले काम उत्तम रीतीने करतात त्यांना जबाबदारीचे व महत्वाचे काम सांगत जा. जे लोक मध्यम प्रतीचे काम करतात त्यांना कमी महत्वाची कामे नेमून दे आणि जे लोक अगदीच वाईट प्रकारे दिलेले काम करतात त्यांना जराही महत्व नसेलेले काम दे. तुझ्याकडे नेमलेले सेवक किंवा वैद्य कौशल्यपूर्ण असून सुद्धा कामात हलगर्जीपणा करत असतील, तर त्यांना शिक्षा केल्यावाचून राहू नकोस. धनसंचय करणाऱ्या ब्राह्मणांचा तू सन्मान करत नाहीस ना? काही ब्राह्मण स्वत:ला विद्वान समजून लोकांना अर्थशून्य उपदेश देतात. त्यांचा सत्कार करू नकोस.
“तुझे चाकर तुझा अपमान तर करत नाहीत ना? तसेच ते तुला घाबरून पण राहता कामा नये. तुझ्या सेवकांवर जर कोणताही आरोप केला गेला तर रागाच्या भरात त्याला शिक्षा करू नकोस. गुन्ह्याची कसून चौकशी करून तो सिद्ध झाला तर शिक्षा कर. एखाद्या चोराला मुद्देमालासकट पकडले गेले असेल तर लाच घेऊन कोणी त्याची सुटका करत नाही ना?
“भरता! तुझा सेनापती शिस्तप्रिय, शूर आणि शहाणा असावा. तसेच तो सैनिकांमध्ये प्रिय असावा. महत्वाचे म्हणजे, तो सेनापती तूच नेमलेला असावा. भरता, रणांगणात शौर्य गाजवलेल्या वीर सैनिकांचा तू सन्मान करतोस ना? तुझ्या सैन्यातील सेवक, सैनिक व अधिकारी यांचे पगार वेळच्यावेळी देण्याचे बघ. पगार देण्यात उशीर झाला तर सेवकांच्या मनात राजाविषयी क्रोध निर्माण होतो आणि असे सेवक लाच घेण्यास प्रवृत्त होऊ शकतात. तुझे सैनिक निष्ठावान आहेत ना? तुझ्यासाठी व अयोध्येसाठी ते जीव देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, असेच आहेत ना?
“तुझ्या हेरांना इतर हेरांची माहिती अथवा ओळख असू नये. ते तुला राज्यातील व शत्रूंच्या राज्यातील माहिती आणून देतात ना? तसेच ते तुला सेनापती, कोषाध्यक्ष, न्यायाधीश आदि १५ महत्वाच्या खात्यातील माहिती वेळेवर व गुप्तपणे पुरवतात ना?
कच्चिद् व्यपास्तान् अहितान् प्रतियातामः च सर्वदा | दुर्बलान् अनवज्नाय वर्तसे रिपु सूदन || २-१००-३७
“हे रिपुंजया! तू तुझ्या शत्रूंना कमकुवत तर समजत नाहीस ना? कमकुवत समजून त्यांना सोडून दिलेस तर ते पुनश्च हल्ला करतात.
“आपल्या पूर्वजांनी जशी अयोध्येची काळजी घेतली तशीच काळजी तू वाहतोस ना? पूर्वीपासून चालत आलेल्या नित्य व्यवहाराचे पालन करत रहा. तुझे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असेल याविषयी दक्ष रहा! राज्याचे धन चुकीच्या लोकांच्या हातात नाही गेले पाहिजे.
कच्चित् सर्वाणि दुर्गाणि धन धान्य आयुध उदकैः | यन्त्रैः च परिपूर्णानि तथा शिल्पि धनुर्धरैः || २-१००-५३
“राजपुत्रा! तुझ्या सर्व किल्ल्यात पाण्याचा व अन्नधान्याचा भरपूर साठा असावा. शस्त्रास्त्रांनी सज्ज असे तुझे किल्ले असावेत. प्रत्येक किल्ल्यावर अनेक शूर योद्धे व कुशल शिल्पी नेमलेले असावेत. प्रजेला गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध करून देतोस ना? अयोध्या नगरी तिच्या अभेद्य तटबंदीने व तिच्या अश्व, गज व रथांनी युक्त सैन्याने रक्षिलेली आहे. तेथील विद्वान ब्राह्मण, वीर क्षत्रिय, निपुण वैश्य व कुशल शूद्र नेहमी आपापल्या कामात व्यग्र असतात. अयोध्या अनेक मंदिरे, प्रासाद, पुष्करणी यांनी सजली आहे. सुखात राहणाऱ्या स्त्री-पुरुषांनी गजबजलेली आहे. तेथील शेते नांगरलेली आहेत. तेथील शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नाही. अयोध्या गोधनाने युक्त आहे. भरता, शेतकरी व गोपालन करणाऱ्यांवर तुझे लक्ष असू दे. त्यांची भरभराट होईल या कडे पहा.
कच्चिद् दर्शयसे नित्यम् मनुष्याणाम् विभूषितम् | उत्थाय उत्थाय पूर्व अह्णे राज पुत्रो महापथे || २-१००-५१
“राजपुत्रा! तू दररोज सकाळी राजवस्त्र परिधान करून प्रजाजनांना दर्शन देतोस ना? राजाने प्रजेचे रक्षण करणे हा त्याचा धर्म आहे. तो धर्म तू पाळतोस ना? राज्यातील स्त्रियांची काळजी करतोस ना? त्यांचे रक्षण केले जात आहे ना? जेव्हा श्रीमंत विरुद्ध गरीब खटला न्यायाधीशाकडे येईल, तेव्हा गरिबाला न्याय मिळेल याकडे लक्ष पुरव. चौकाचौकातील वृक्षांची निगा राखण्याविषयी दक्ष आहेस ना? हत्तींनी युक्त असलेल्या वनांची देखभाल होते ना? तू आहेत तेवढ्या अश्व व गजांवर समाधान मानू नकोस. त्यांची संख्या वाढेल याकडे लक्ष पुरव.
“राजाने खोटेपणाने वागणे, विनाकारण रागावणे, कामात चालढकल करणे, शहाण्यांचा सल्ला न ऐकणे, मंत्र्यांना सल्ला न विचारणे, ठरलेले प्रकल्प सुरु न करणे, शिकारीचा नाद करणे, द्यूत खेळणे, दिवसा झोपणे, गर्विष्ट असणे, सतत नाचगाण्यात वेळ दडवणे अशा वाईट सवयीपासून दूर राहिले पाहिजे.
अवाप्य कृत्स्नां वसुधां यथाव | दितश्छ्युतः स्वर्गमुपैति विद्वान् || २-१००-७६
“भरता! धर्माने व न्यायाने राज्य करणाऱ्या राजाला कीर्ती आणि पुण्य तर मिळतेच पण मृत्युनंतर त्याला स्वर्गप्राप्ती होते! म्हणून तू उत्तम प्रकारे राज्य कर!”
भरत एक उत्तम राजा व्हावा, त्याची कीर्ती दूरवर पोचावी व त्याच्या आयुष्याचे सार्थक व्हावे म्हणून श्रीरामाने केलेला हा मौलिक उपदेश! आपल्या राज्याची भरभराट व्हावी, कोणत्याही शत्रूने आक्रमण करू नये व प्रजा सुखात रहावी म्हणून केलेला उपदेश! या उपदेशातून प्रत्येक नागरिकाने आपले काम उत्तम करावे व प्रत्येकाने आपापल्या कामात कुशल व व्यस्त असावे हे एका चांगल्या राज्याचे लक्षण होते हे कळते. श्रीरामाने जसा उपदेश केला, तसेच राज्य त्याने नंतर केले असणार यात शंका नाही. राज्याभिषेक झाल्यावर श्रीरामाने स्थापन केलेले राज्य कसे केले असेल व त्याला ‘रामराज्य’ का म्हटले असेल ते या भाषणावरून सांगता येण्यासारखे आहे.
संदर्भ –
१. वाल्मिकी रामायण, अयोध्या कांड, सर्ग १००
תגובות