भारतामध्ये परंपरेनुसार सूर्याच्या नक्षत्र प्रवेशानुसार पावसाचा अंदाज बांधला जातो. आज ही शेतकरी या अंदाजावरून शेतीचे नियोजन करतात. दाते पंचांगानुसार यावर्षीचा नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज काय आहे हे पाहूया.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_3460b71a2f34404685aa3ed22314e6d2~mv2.gif/v1/fill/w_500,h_217,al_c,pstr/f0da78_3460b71a2f34404685aa3ed22314e6d2~mv2.gif)
हवामान व पर्जन्य विचार
शके १९४६ चैत्र शु. १ मंगळवार, 9 एप्रिल 2024 रोजी नूतन क्रोधी संवत्सर सुरु होत आहे. वर्षप्रवेश कुंडलीत धनु लग्न उदित असून वरुणमंडल योग होत आहे. मेष प्रवेश कुंडलीत वृश्चिक लग्न उदित असून अग्निमंडल योग होत आहे. 10 एप्रिलची मंगळ शनि युति, 11 एप्रिलची ऋतुउत्तेजक रवि बुध युति, 19 एप्रिलची बुध शुक्र युति आणि 18 मे ची रवि गुरु युति आणि ग्रहमानाचा विचार करता एप्रिल व मे मध्ये उष्णतामान खूप वाढेल.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन 1 ते 4 जून मध्ये वेळेवर होईल मात्र महाराष्ट्रात 10 जून नंतर मान्सून प्रवेश करेल आणि 22 जून ते 10 ऑगस्ट या काळात मुबलक पाऊस होईल. काही भागात जनजीवन विस्कळीत होईल. 10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात पर्जन्यमान मध्यम राहील नंतर 20 सप्टेंबर पर्यंत पाऊस ओढ धरेल व वृष्टीखंडित होईल. पुन्हा पाऊस सक्रीय होऊन 20 ऑक्टोबर पर्यंत मध्यम पाऊस पडेल आणि सरासरी भरून निघेल इतका पाऊस होईल. तसेच 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंत पाऊस अपेक्षित आहे. एकंदरीत आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, हस्त व चित्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल.
(हा पर्जन्य विचार लिहिण्याचे कामी ज्यो. सिद्धेश्वर मारटकर (पुणे) यांचे सहकार्य लाभले आहे.)
नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज
मृग नक्षत्र - दि. 7 जून 2024 रोजी शुक्रवारी उत्तररात्री १ वाजून ०५ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी कुंभ लग्न असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून फक्त शनि नीर नाडीत आहे. 4 जूनची रवि शुक्र युति व बुध गुरु युति तसेच 14 जूनची रवि बुध युति आणि 17 जूनची बुध शुक्र युति यांचा विचार करता. या नक्षत्राच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची सुरुवात होईल. वादळे होतील. दि. 9 ते 13, 16 ते 18 पाऊस अपेक्षित.
आर्द्रा नक्षत्र - दि. 21 जून 2024 रोजी शुक्रवारी रात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी सूर्याचे आर्द्रा नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी कुंभ लग्न उदित असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक मोर असून फक्त शनि नीर नाडीत आहे. 17 जूनला झालेल्या बुध शुक्र युतीचा परिणाम या नक्षत्राच्या पावसावर होणार असून या नक्षत्राचा पाऊस बऱ्यापैकी आणि सर्वत्र होईल. दि. जून 24 ते 28 जुलै 3, 4 पाऊस अपेक्षित.
पुनर्वसु नक्षत्र - दि. 5 जुलै 2024 रोजी शुक्रवारी रात्री ११:४० वाजता सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश समयी मीन लग्न असून वरुणमंडल योग आहे. पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून बुध व शनि हे जलनाडीत आहेत. एकंदरीत ग्रहमान पाहता या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले असेल काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा येथे मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. दि. 6 ते 11, 15, 16, 17 पाऊस अपेक्षित.
पुष्य नक्षत्र - दि. 19 जुलै 2024 रोजी शुक्रवारी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत असून त्यावेळेस मीन लग्न आणि वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक बेडूक असून रवि, बुध, शुक्र व शनि हे जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल. पूर, अतिवृष्टीची शक्यता आहे. दि. 21 ते 25, 30, 31 ला पाऊस अपेक्षित.
आश्लेषा नक्षत्र - दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी शुकवारी रात्री १०:०६ वाजता सूर्याचे आश्लेषा नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी मीन लग्न उदित असून वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवि, बुध, शुक्र व शनि हे जलनाडीत आहेत. 8 ऑगस्टची बुध शुक्र युति व ग्रहमान पाहता या नक्षत्राच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी होईल. उत्तरार्धात पाऊस खंडित होईल. एकंदरीत या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील. दि. 2 ते 7, 12, 13, 14 पाऊस अपेक्षित.
मघा नक्षत्र - दि. 16 ऑगस्ट 2024 शुक्रवारी रात्री ७:४४ वाजता सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश समयी कुंभ लग्न असून वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे आणि रवि, बुध, शुक्र व शनि जलनाडीत आहेत. 14 ऑगस्टची मंगळ गुरु युति 19 ऑगस्टची रवि बुध युति आणि शुक्र शनि प्रतियुतीचा विचार करता या नक्षत्रात खंडित वृष्टीचे योग आहेत. पाऊस हुलकावण्या देईल. काही भागात जोरदार सरी होतील तर काही भागात पाऊस ओढ धरेल. दि. 17 ते 20, 24, 25, 28, 29 पाऊस अपेक्षित.
पूर्वा नक्षत्र - दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी दुपारी ३:४६ वाजता सूर्याचे पूर्वा नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी धनु लग्न आणि वरुणमंडल योग आहे. उंदीर हे वाहन असून रवि, बुध, शुक्र, शनि हे जलनाडीत आहेत. 8 सप्टेंबरची रवि शनि प्रतियुति व ग्रहमानाचा विचार करता या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा या प्रदेशात बऱ्यापैकी पाऊस पडेल. दि. ऑग. 30, 31 सप्टें. 2, 3, 6, 7, 8 पाऊस अपेक्षित.
उत्तरा नक्षत्र - दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवारी सकाळी ९:३५ वाजता सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश समयी तूळ लग्न असून वायुमंडल योग आहे. पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून रवि, बुध, शनि हे जलनाडीत आहेत. 18 सप्टेंबरची बुध शनि प्रतियुति व ग्रहमान पाहता या नक्षत्रात पाऊस ओढ धरेल. मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोड्या पावसाची शक्यता आहे. दि. 13, 14, 15, 23, 24, 25 पाऊस अपेक्षित.
हस्त नक्षत्र - दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवारी उत्तररात्री १ वाजून १० मिनिटांनी सूर्याचे हस्त नक्षत्र सुरु होत असून त्यावेळी मिथुन लग्न आणि वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे पर्जन्यसूचक मोर हे वाहन असून बुध व शनि नीर नाडीत आहेत. 30 सप्टेंबरच्या ऋतुउत्तेजक रवि बुध युतीमुळे उष्णतामान वाढेल आणि दक्षिणेकडील प्रदेशात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही भागात नुकसान होईल दि. सप्टें 27 ते 30, अक्टो 2, 3 पाऊस अपेक्षित.
चित्रा नक्षत्र - दि. 10 अक्टोबर 2024 रोजी गुरुवारी दुपारी २ वाजून ०६ मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश समयी मकर लग्न असून इंद्रमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस असून मंगळ व शनि जलनाडीत आहेत. या नक्षत्रात परतीचा पाऊस साथ देईल. मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा भागात बऱ्यापैकी पाऊस होईल. सरासरी भरून काढण्यास मदत होईल. दि. 10, 11, 14, 15, 21, 22 पाऊस अपेक्षित.
स्वाती नक्षत्र - दि. 23 अक्टोबर 2024 रोजी बुधवारी रात्री १२:४२ वाजता सूर्याचे स्वाती नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी कर्क लग्न उदित असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून मंगळ व शनि जलनाडीत आहेत. या नक्षत्राच्या पूर्वार्धात मध्यम वृष्टीचे योग असून खंडित वृष्टी होईल पाऊस हुलकावण्या देईल. नक्षत्राच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित. दि. 24 ते 28, नोव्हें 2 नंतर पाऊस अपेक्षित.
留言