सूर्याचा मकरेत प्रवेश झाल्यावर पुण्यकालाचे दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या दिवशी तिळगूळ दान करण्याचे व खाण्याचे महत्त्व आहे.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_ae34100d1fce4f7e9a26792dcf8013dc~mv2.png/v1/fill/w_980,h_551,al_c,q_90,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_ae34100d1fce4f7e9a26792dcf8013dc~mv2.png)
संक्रांतीचा पुण्यकाल - मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८:५५ ते दुपारी ४:५५ पर्यंत आहे.
या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून त्या पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण (तीळ असलेले पदार्थ खाणे) व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_49477a1b2881489586499571c1f998c3~mv2.jpg/v1/fill/w_980,h_567,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_49477a1b2881489586499571c1f998c3~mv2.jpg)
शके १९४६ पौष कृ. १, मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव करणावर संक्रमण होत असल्याने वाहनादि प्रकार याप्रमाणे - वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाति असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनांव व नाक्षत्रनांव महोदरी असून सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करु नयेत.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_ac6196df7aec465e8afb5c26dc068498~mv2.jpg/v1/fill/w_980,h_533,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_ac6196df7aec465e8afb5c26dc068498~mv2.jpg)
दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
मकर संक्रांती हा भारतीय सण असून ही इंग्रजी दिनांकाशी कसा काय जोडला गेला आहे ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
मकर संक्रांती आणि इंग्रजी दिनांक - मकर संक्रांती ही सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. ती 14 जानेवारीला येते असे मात्र मुळीच नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे व १० सेकंद एवढा कालावधी लागतो. याचाच अर्थ प्रत्येक वर्षी मकर राशीत प्रवेश (सुमारे) ६ तास पुढे जातो म्हणजे चार वर्षांनी एक दिवस (२४ तास) पुढे जाणे आवश्यक आहे. परंतु इंग्रजी कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे इसवी सनास ४ ने भाग जाणाऱ्या वर्षी म्हणजेच प्लुत (लिप) वर्षात फेब्रुवारी महिन्यांत २९ दिवस असतात व त्या वर्षाचे दिवस ३६६ होतात. या 29 फेब्रुवारीमुळेच संक्रांत अनेक वर्षे एका तारखेला येते. परंतु ज्या शतक वर्षांना ४ ने भाग जातो पण ४०० ने भाग जात नाही, त्या वर्षी फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. त्यामुळे त्या शतक वर्षापासून संक्रांत एक तारीख पुढे जाते. मात्र ६ तास ९ मिनिटे १० सेकंदांनी संक्रमण वेळ जास्तीची असल्याने तो काळ साठत जाऊन १५७ वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे जाते. पण हा बदल एकदम होत नाही. तो टप्प्याटप्प्याने होतो.
पहिल्या टप्प्यात दर ४ वर्षानी १ दिवस, दुसऱ्या टप्प्यात ३ वर्षांनी १ दिवस, तिसऱ्या टप्प्यात २ वर्षांनी १ दिवस आणि चौथ्या टप्प्यात एकच तारीख काही वर्ष राहते. सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला येत होती. सन 1899 मध्ये निरयन मकर संक्रांती 13 जानेवारीला आली होती. सन 1972 पर्यंत निरयन मकर संक्रांती 14 जानेवारीला येत होती. 1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्राती कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला असणार आहे. इसवी सन 2085 नंतर दरवर्षी ही संक्रांत 15 जानेवारीला असेल त्यानंतर सन 2100 ला ४०० ने भाग जात नसल्याने सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत सन 3246 मध्ये मकरसंक्रांती 1 फेब्रुवारीला येणार आहे.
असा हा सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाशी निगडीत असलेला मकर संक्रांतीचा सण आपणा सर्वांना आरोग्यदायी होवो, हीच शुभेच्छा !
Comentarios