![](https://static.wixstatic.com/media/f0da78_0960b1975afc42d2b61de1dfcea11736~mv2.png/v1/fill/w_980,h_551,al_c,q_90,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_0960b1975afc42d2b61de1dfcea11736~mv2.png)
मकर संक्रांती ही सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. यावर्षी शके 1945 पौष शु. 3, रविवार 14 जानेवारी 2024 रोजी उत्तररात्री 26:43 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. (14 जानेवारीचे 26:43 म्हणजे 15 जानेवारीचे पहाटे 2:43, भारतीय परंपरेप्रमाणे दिवस सूर्योदयाला सुरु होत असल्याने रात्री बारा नंतर सूर्योदयापर्यंत वेळ वाढवत नेली जाते) त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच मकरसंक्रांतीचा उत्सव 15 जानेवारी रोजी सोमवारी आहे.
मकर संक्रांतीचे दिवशी पाण्यात तिळ घालून स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण करणे, तिळाचा अन्नात समावेश करणे आणि तिळ दान करणे अशा सहा प्रकारांनी तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
मकर संक्रमणाच्या वेळच्या करणावरून संक्रांतीचे फल सांगण्याची परंपरा आहे. या फलामध्ये संक्रांत देवता ज्या ज्या वस्तू, प्राणी, पदार्थ वापरते त्या वस्तूंचे दुर्भिक्ष होते किंवा त्यांचा नाश होतो, त्या वस्तू महाग होतात असे मानले जाते तसेच ती ज्या दिशेने येते तिकडे आनंद, भरभराट होते तर ज्या दिशेस जाते अथवा पाहते तिकडे त्रास होतात असे मानले जाते. यावर्षी संक्रमणाचे वेळेस विष्टी करण आहे या वेळेस वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. काळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात भाला घतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता दूर्वा घेतलेल्या असून चित्रान्न भक्षण करीत आहे. ब्राह्मण जाति असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे. वारनांव घोरा व नाक्षत्रनांव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे.
दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
अनेकांना असा ही प्रश्न पडतो की वर्षभरातील सर्व सण हे दर वर्षी वेगवेगळ्या तारखांना येतात पण मकर संक्रांती मात्र 14 जानेवारीलाच कशी काय येते?
हा सण हिंदू धर्मातील असला तरीही इंग्रजी दिनांकाशी कसा काय जोडला गेला आहे?
आज आपण याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ या.
मकर संक्रांती दर वर्षी 14 जानेवारीलाच येते असे मात्र मुळीच नाही. मकर संक्रांती ही सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. सूर्याचा मकरेत प्रवेश झाल्यावर पुण्यकालाचे दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश दिवसाच्या कुठल्या प्रहरात होतो यावर संक्रांतीचा पुण्यकाल म्हणजे संक्रांतीचा दिवस अवलंबून असतो. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस, 6 तास, 9 मिनिटे आणि 10 सेकंद एवढा कालावधी लागतो. (हा कालावधी 365 दिवसांचा असल्याने मकर संक्रांतीचा इंग्रजी दिनांकाशी संबंध असल्यासारखे वाटते.) परंतु इंग्रजी कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे इसवी सनास 4 ने भाग जाणाऱ्या वर्षी म्हणजेच प्लुत (लिप) वर्षात फेब्रुवारी महिन्यांत 29 दिवस असतात व त्या वर्षाचे दिवस 366 होतात. या 29 फेब्रुवारीमुळेच संक्रांत अनेक वर्षे एका तारखेला येते. परंतु ज्या शतक वर्षांना 4 ने भाग जातो पण 400 ने भाग जात नाही, त्या वर्षी फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. त्यामुळे त्या शतक वर्षापासून संक्रांत एक तारीख पुढे जाते. मात्र 6 तास 9 मिनिटे 10 सेकंदांनी संक्रमण वेळ जास्तीची असल्याने तो काळ साठत जाऊन 157 वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे जाते. पण हा बदल एकदम होत नाही. तो टप्प्याटप्प्याने होतो.
पहिल्या टप्प्यात दर 4 वर्षानी 1 दिवस, दुसऱ्या टप्प्यात 3 वर्षांनी 1 दिवस, तिसऱ्या टप्प्यात 2 वर्षांनी 1 दिवस आणि चौथ्या टप्प्यात एकच तारीख काही वर्ष राहते. सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला येत होती. सन 1899 मध्ये निरयन मकर संक्रांती 13 जानेवारीला आली होती. सन 1972 पर्यंत निरयन मकर संक्रांती 14 जानेवारीला येत होती. 1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्राती कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला असणार आहे. इसवी सन 2085 नंतर दरवर्षी ही संक्रांत 15 जानेवारीला असेल त्यानंतर सन 2100 ला 400 ने भाग जात नसल्याने सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येईल. अशा रीतीने पुढे सरकत सरकत सन 3246 मध्ये मकरसंक्रांती 1 फेब्रुवारीला येणार आहे.
コメント