top of page

महाशिवरात्रि




माघ कृ. १४, निशीथकाल (रात्रौ १२:२५ ते रात्रौ १:१३)

 

प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि व्रत केले जाते. निशीथकाली म्हणजे मध्यरात्री असलेल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि व्रत करावे. माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हणतात.


नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय ।।


काही पौराणिक कथांमध्ये माघ महिन्यातील शिवरात्रीचे महत्त्व असल्याने या शिवरात्रीस ‘महाशिवरात्रि’ असे म्हणले जाते. प्रत्येक महिन्यातील शिवरात्रि न करणारे देखील महाशिवरात्रीचे व्रत करतात. संपूर्ण भारतामध्ये महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रि निमित्त मोठा उत्सव केला जातो. निशीथकाली (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीचे दिवशी शिवरात्रि व्रत करावयाचे असते.


ईशान संहितेतील ‘शिवलिंगतयोद्भूतः कोटिसूर्यसमप्रभः।’ या वचनानुसार माघ वद्य चतुर्दशीच्या मध्यरात्री ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे त्या शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हणले जाते.


शिव म्हणजे मंगलमय, कल्याणस्वरूप सदाशिव तत्त्व. त्यालाच परमात्मा किंवा आदिशिव असेही म्हणतात. जन्ममरणादि कोणत्याही विकाराचा त्याला तिळमात्रही स्पर्श होत नाही. त्रिविध दुःखांपैकी कशाचाही लवलेश नाही. वश् या धातूपासून वर्णव्यत्यासाने शिव शब्द निष्पन्न झाला आहे. वश् धातूचा एक अर्थ प्रकाशणे असा आहे. त्यावरून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो. शिव हा अखिल भारतात सर्व जातीजमातींना पूज्य असा महादेव आहे. वेदात यालाच रुद्र असे नाव आहे.

 

शिव पूजनाविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती –


  • शिवाची पूजा लिंगरूपात केली जाते.

  • सोमवार हा शिवाचा वार मानला जातो.

  • प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दिवशी संपूर्ण उपवास करतात.

  • शिवाला अभिषेक प्रिय असतो. रुद्र संख्या ११ असल्याने ११ वेळा रुद्राध्याय म्हणून अभिषेक करतात.

  • शिवव्रत एकदा स्वीकारले, की ते मोडायचे नाही, असा संकेत आहे.

  • शिवाला बिल्वपत्र व श्वेत कमळ (पांढरे कमळ) प्रिय आहे असे मानले जाते.

  • शिवाला नमस्कार पाच घालावे असे सांगितले जाते.

  • शिवाची प्रदक्षिणा सोमसूत्री असते, म्हणजे डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळ असते तिथ पर्यंत जाऊन ती न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची.

  • शिवाला गंध लावायचे ते आडवे किंवा चंद्रकोरीच्या आकाराचे लावतात.

 

ॐ नमः शिवाय !

Comments


Vist our 
Website

bottom of page