यावर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे. मात्र हे ग्रहण छायाकल्प पद्धतीचे असल्याने आणि भारतात दिसत नसल्याने भारतामध्ये तसेच भारताबाहेर देखील कोठेही त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
होलिका दहनासाठी मुख्यकाल हा प्रदोषकाल (म्हणजे सूर्यास्तानंतर अंदाजे अडीच तासाचा अवधी) असल्याने त्या दिवशी भद्रा असली तरीही सूर्यास्तानंतर परंपरेप्रमाणे सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी. होलिकेस प्रदक्षिणा घालून एकदा शंखध्वनि करावा. नारळ भाजून प्रसाद घ्यावा.
मंदिरासमोर किंवा मोकळ्या मैदानात सोयीस्कर ठिकाणची जागा सूर्यास्त समयी झाडून व पाणी मारुन स्वच्छ करून लाकडे, गोवऱ्या गोल रचून होलिकायै नमः। अशा नाममंत्राने पूजा करून होलिका पेटविली जाते. तिच्याभोवती नाचत पालथ्या हाताने शंखध्वनि (बोंब मारावी) करावा. यामुळे मनातील दुष्ट प्रवृत्ति शांत होतात. घरात त्रास देणाऱ्या जीवकीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे ते जीवाणू नष्ट होतात असे मानले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून सर्व दुष्ट फलांचा नाश होण्याकरिता पुढील श्लोक म्हणून होळीच्या राखेला वंदन करावे, धूलिवंदनाने मानसिक आणि शारीरिक व्याधींची पीड़ा होत नाही असे सांगितले जाते.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_95ab8ec77c5345e4b035afd347415db4~mv2.jpg/v1/fill/w_611,h_357,al_c,q_80,enc_auto/f0da78_95ab8ec77c5345e4b035afd347415db4~mv2.jpg)
सूर्याभोवतीच्या पृथ्वीच्या परिभ्रमणाने ऋतु होतात. ऋतु होण्यास मुख्यतः सूर्य कारण आहे. विषुववृत्तावर सूर्य आला की दिवस व रात्र ही १२-१२ तासांची होतात. हा दिवस 21 मार्चचा असतो साधारणपणे 21 मार्चच्या आसपास होळीचा दिवस येतो. विषुववृत्तावर सूर्य आला की, वसंतऋतु सुरु होतो व उष्णता वाढू लागते. उष्णता वाढली की, जमीन तापते, हवेचा जमिनीलगतचा थर तापतो. होलिकेमुळे जमिनीलगतचे तापमान वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यास मदत होते असे जाणकारांचे मत आहे. योग्य वेळी पेटविलेल्या होलिकेचा धूर आकाशात कोणत्या दिशेने जातो यावरून गावोगावीचे शेतकरी पुढील पावसाचा अंदाज बांधीत असत.
पौराणिक कथांमधील संदर्भ
हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने होलिकेला प्रल्हादास मांडीवर घेऊन होळीवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील असे त्याला वाटत होते, पण झाले उलटे होलिका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पेटवून आनंद व्यक्त केला जातो. भगवान शिवांनी मदनाला जाळले तो ही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात. तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. बहुतेक या वरूनच होलिके भोवती प्रदक्षिणा घालताना बोंब मारण्याची पद्धती आली असावी.
Kommentare