top of page

शयनी (आषाढी) एकादशी


आषाढ शुद्ध एकादशीला शयनी किंवा आषाढी असें नांव आहे. या एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शेषावर शयन करतात, अशी पौराणिक कथा आहे. शयनी एकादशीला विष्णुशयनोत्सव नांवाचा विधी करतात. याच दिवशी चातुर्मासाचा आरंभ होतो.


प्रत्येक चान्द्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११वी तिथी म्हणजे एकादशी. या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवासाचं पारणं करतात. एकादशीचे स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. ज्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत, असे लिहिलेले असते. स्मार्त ही पूर्व दिवशी येते व भागवत दुसऱ्या दिवशी येते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीविद्ध (द्वादशीयुक्त) असते. वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात.


मध्ययुगात शूलपाणीने (इ. स. १३७५ - १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ. स. १६ वे शतक) एकादशीतत्त्व हे ग्रंथ केवळ एकादशीवर लिहिलेले आहेत. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्वविवेचन या ग्रंथांत शेकडो पाने एकादशीच्या विवेचनाची आहेत. इतके महत्व एकादशी व्रताचे आहे.


प्रत्येक चान्द्रमासात दोन, याप्रमाणे वर्षाच्या २४ एकादशी येतात. त्यांची नांवें पुढीलप्रमाणे -

शुक्लपक्ष - (चैत्रापासून) कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी (आषाढी), पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी (कार्तिकी), मोक्षदा, पुत्रदा (प्रजावर्धिनी), जया (जयदा) व आमलकी.

कृष्णपक्ष - (चैत्रापासून) वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी.

अधिक मासातील दोन्ही एकादशींना कमला एकादशी असे नांव आहे.


आषाढ शुद्ध एकादशीला शयनी असें नांव आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात. शयनी एकादशीला देव झोपतात व प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. याचा अर्थ असा की, आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो. उत्तरायण हा देवांचा दिवस आहे तर दक्षिणायन ही रात्र आहे. सामान्यतः आषाढ ते मार्गशीर्ष दक्षिणायन असते म्हणजे देवाची रात्र असते म्हणून देव शयन करतात. उत्तरायण सुरू होण्यापूर्वी म्हणजे दिवस सुरू होण्यापूर्वी कार्तिक शुद्ध एकादशीला देवांची पहाट सुरू होते. देव त्यावेळी उठतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी असे नांव आहे.


या शयन काळात आसुरी प्रवृत्तीची वाढ होत असते. अधिक खावे असे माणसांना वाटत असते. पण त्याचे परिणाम आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहेत. खरे असे आहे की, खाण्यावर जर माणसाने नियंत्रण ठेवले तर त्याची प्रकृति कधीही बिघडणार नाही. धार्मिक भाग सोडला तर निसर्गाप्रमाणे हे चारही महिने पावसाचे असतात. या काळात पचनशक्ती कमी होते. म्हणूनच उपवास, व्रते करण्यास सांगितले आहे. असुर याचा अर्थ येथे रोग, अनारोग्य घेण्यास हरकत नाही. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आपले पूर्वज मोठ्या श्रद्धेने करीत होते. त्याचे कारण यामागील विज्ञान त्यांना माहीत होते. हिंदु धर्मात व संस्कृतीत व्रत वैकल्ये, सणवार, उपासना, उपवास यांची ऋतुपरत्वे उत्तम सांगड घातली आहे. ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत नाही व आपले आरोग्य सांभाळले जाते.


पंढरीची वारी - वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका सिद्धांतानुसार, वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली . वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. आषाढी कार्तिकी प्रमाणेच पंढरपुरात दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीस छोट्या प्रमाणात वारी भरतेच. दर महिन्याच्या शुक्ल दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन. एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून कालाप्रसाद घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते. निष्ठावंत वारकर्‍यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्‌गीता, काहींच्याबरोबर तुळशी वृंदावन ही असतात.


संदर्भ - कालसुसंगत आचारधर्म, धर्मशास्त्रीय निर्णय, भारतीय संस्कृतिकोश, धर्मशास्त्राचा इतिहास

Comentarios


Vist our 
Website

bottom of page