top of page

अयन खरे कोणते ?



आपणा सर्वांना दक्षिणायन व उत्तरायण अशी दोन अयने आहेत हे माहीत आहे. यांचा उल्लेख पंचांगाच्या प्रत्येक पंधरवड्याच्या पानावर केलेला असतो आणि अयनारंभ कधी होतो याचा दिवस स्वतंत्रपणे पंचांगात दिलेला असतो.

(सौर वर्ष व इंग्रजी कॅलेंडर चे वर्षमान सारखे आहे आणि व्यवहारात इंग्रजी तारीख वापरात असल्याने समजण्यास सोपे जावे म्हणून घटनांशी संबंधित इंग्रजी तारखांचे उल्लेख केलेले आहेत.)


काही पंचांगात सूर्याचे निरयन कर्क संक्रमण झाल्यावर म्हणजे सध्या १६/१७ जुलै रोजी दक्षिणायनारंभ देतात आणि सूर्याचे निरयन मकर संक्रमण झाल्यावर म्हणजे सध्या १४/१५ जानेवारी रोजी उत्तरायणारंभ देतात. मात्र दाते पंचांग इ. कांही पंचांगात २०/२१ जून रोजी दक्षिणायनारंभ आणि २१/२२ डिसेंबर रोजी उत्तरायणारंभ देतात. तेंव्हा अयनारंभ नेमका कोणता मानावयाचा त्यासाठी अयन म्हणजे काय ? ते पाहू !


अयन म्हणजे जाणे, चलन होणे. आपण रोजचा सूर्योदय-सूर्यास्त पाहिला असता क्षितिज संदर्भाने सूर्यबिंबाची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते. या सरकण्याला सुद्धा मर्यादा आहे. सूर्याभोवती परिभ्रमण करणा-या पृथ्वीचा आस २३।। अंशाने कलता आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्याने सूर्याचा दैनिक मार्ग उत्तर व दक्षिण असा सरकत जातो. पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३।। अंशापर्यंत सरकत जाण्याची मर्यादा सूर्याने गाठली की २०/२१ जून पासून तो दक्षिणेकडे येण्यास सुरुवात करतो त्यास दक्षिणायनारंभ म्हणतात (याचा निरयन सूर्य कर्क संक्रमणाशी संबंध नाही.)


तसेच याच्या उलट पूर्वबिंदूच्या दक्षिणेस २३।। अंशापर्यंत सूर्य गेल्यावर तो २१/२२ डिसेंबर पासून उत्तरेकडे येण्यास सुरुवात करतो त्यास उत्तरायणारंभ म्हणतात (याचा निरयन सूर्य मकर संक्रमणाशी संबंध नाही) अशा तऱ्हेने उत्तरायण किंवा दक्षिणायन ही सूर्याच्या बाबतीत अनुभवाला येणारी (सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, अधिक्रमण, ग्रहण, पिघान या सारखी) एक आकाशस्थ नैसर्गिक घटना आहे.


सुमारे १७०० वर्षापूर्वी अयनांश शून्य असताना सूर्याचे कर्कसंक्रमण व दक्षिणायनारंभाचा दिवस एकच होता. तसेच सूर्याचे मकर संक्रमण व उत्तरायणारंभाचा दिवसही एकच होता. मात्र साधारणपणे ७२ वर्षानंतर उत्तरायणारंभ झाल्यावर एक दिवसानी सूर्याचे मकर संक्रमण होऊ लागले. याप्रमाणे एक-एक दिवस पुढे पुढे मकर संक्रमण होत जात असून सध्या उत्तरायणारंभ झाल्यावर २४ दिवसानंतर म्हणजे १४/१५ जाने रोजी मकर संक्रमण होत आहे. आणखी कांही वर्षांनी हे मकर संक्रमण १६, १७, १८.....२२, २३ जानेवारीला व त्यानंतर सुद्धा कांही दिवसांनी होणार आहे. अशा वेळेस ज्योतिषशास्त्राने आणि विज्ञानाने सिद्ध केलेली प्रत्यक्ष होणारी अयनारंभ ही आकाशस्थ घटना मान्य करणे शास्त्रीय व योग्य होईल.


करिदिन कोणते आहेत हे सांगताना धर्मशास्त्रकारांनी “पंचकं ग्रहण होलिकायनं प्रेतदाहविधि भावुका दिनम् । तत्परंच करिसंज्ञकं दिनम्” असे वचन दिले आहे. यामध्ये अयनदिनाच्या दुसरे दिवशी करिदिन असे आहे. वरील शास्त्रीय विचार पाहता निरयन कर्क संक्रमण व मकर संक्रमण हे अयनदिन होऊच शकत नाहीत त्यामुळे १६।१७ जुलै दक्षिणायनारंभ व १४।१५ जानेवारीला उत्तरायणारंभ देणे संयुक्तिक व शास्त्रीय नाही.


भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथाचे लेखक – कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित हे उत्तम ज्योतिष गणिती होऊन गेले. त्यांनी ज्योतिष गणितावर अनेक ग्रंथ लिहून प्रकाशित केले. त्यांच्या विद्वतेची प्रशंसा त्याकाळच्या अनेक पंडितांनी व गणितीयांनी केलेली आहे. त्यांच्या वरील ग्रंथात त्यांनी अयनाविषयी लिहिताना “उदगयन आणि दक्षिणायन या शब्दांनी कोणता काळ घ्यावयाचा आणि त्याकाळी सूर्याची स्थिति कोठे असते याविषयी दोन मते दिसतात, मात्र ज्योतिष सिद्धांत ग्रंथात दोन मते नाहीत. सायन मकर ते सायन कर्क उदगयन व सायन कर्क ते सायन मकर दक्षिणायन असा अर्थ ज्योतिष सिद्धांत ग्रंथात निश्चित केला आहे.” तसेच जेव्हा असा अयनारंभ होतो तेव्हा त्यानंतर ३-४ दिवसात आपण आपल्या घरामध्ये येणा-या सूर्यप्रकाशामध्ये एकाच जागी ठेवलेल्या शंकू सारख्या वस्तूच्या बदलत जाणाऱ्या सावलीची प्रचिती घेऊ शकतो इतके सुस्पष्ट असताना दृक्अयनारंभ मानावयाचा नाही हा केवळ दुराग्रह आहे.”


ज्या पंचांगात १६/१७ जुलै व १४/१५ जानेवारीला अयनारंभ देतात त्या पंचांगात सूर्याची २३।। परमक्रांति मात्र २१ जून व २२ डिसें. रोजी दिलेली असते आणि १६/१७ जुलै व १४/१५ जानेवारीला सूर्याची क्रांति जवळजवळ १।। अंशाने कमी झालेली दाखविलेली असते. हा विरोधाभास नव्हे काय ?


पंचांगात दिलेल्या परम क्रांतीच्या दिवसानंतर २३/२४ दिवसांनी होणा-या निरयन मकर संक्रमणाशी संबंधित मकर संक्रांती करावी हा धर्मशास्त्राचा निर्णय (विचार) आहे म्हणून मकरक्रांतीला उत्तरायणारंभ देणे हा भ्रम आहे.

धार्मिक कार्याचे वेळी देशकालकथन करताना ज्याप्रमाणे तात्कालिक स्थितीचा, काळाचा, प्रदेशाचा उच्चार करतो त्याप्रमाणे ख-या अयन स्थितीचा उच्चार करणे सशास्त्रीय आहे.


म्हणून संपूर्ण जगाने, विज्ञानाने व ज्योतिर्गणिताने मान्य केलेले २०/२१ जून दक्षिणायनारंभ व २१/२२ डिसेंबर उत्तरायणारंभ आम्ही पंचांगात देतो ते सर्वार्थानी योग्य आहेत.

Comentarios


Vist our 
Website

bottom of page